गोलाणी मार्केटमध्ये सुविधांचा दुष्काळ; शेजारी १७ मजली महापालिका इमारत, तरी व्यापारी-कामगार-ग्राहकांच्या नशिबी गैरसोयी!

शौचालयांना कुलूप, महिलांसाठी सुविधेचा अभाव, लिफ्ट बंद अन् जागोजागी कचऱ्याचे ढीग; कर भरणाऱ्या दुकानदारांना मूलभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी? जळगाव | The Citizen Mirror जळगाव शहराचे वैभव आणि शहराच्या व्यापारी हालचालींचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये नागरी सुविधांची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. दिवसभर हजारो नागरिक, ग्राहक, व्यापारी, कामगार आणि…

शौचालयांना कुलूप, महिलांसाठी सुविधेचा अभाव, लिफ्ट बंद अन् जागोजागी कचऱ्याचे ढीग; कर भरणाऱ्या दुकानदारांना मूलभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी?

जळगाव | The Citizen Mirror

जळगाव शहराचे वैभव आणि शहराच्या व्यापारी हालचालींचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये नागरी सुविधांची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. दिवसभर हजारो नागरिक, ग्राहक, व्यापारी, कामगार आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची वर्दळ असलेल्या या मार्केटमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील, तर शहराच्या विकासाच्या दाव्यांचे नेमके वास्तव काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, गोलाणी मार्केटच्या अगदी बाजूलाच जळगाव शहर महानगरपालिकेची १७ मजली प्रशस्त प्रशासकीय इमारत उभी आहे. एका बाजूला अत्याधुनिक प्रशासकीय इमारत आणि दुसऱ्या बाजूला त्याच महापालिकेच्या अखत्यारितील मार्केटमध्ये मूलभूत नागरी सुविधांसाठी नागरिकांची फरफट हे चित्र निश्चितच विरोधाभास निर्माण करणारे आहे.

शौचालये आहेत; पण वापरासाठी बंद!

गोलाणी मार्केटमधील सर्वात गंभीर प्रश्नांपैकी एक म्हणजे शौचालयांची अवस्था. काही शौचालये बंद असून त्यांना थेट कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर मार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यापारी, कर्मचारी आणि येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पुरुषांसाठीच नव्हे, तर महिलांसाठीही पुरेशा आणि वापरण्यायोग्य शौचालय सुविधेचा प्रश्न गंभीर आहे. हजारो नागरिकांची दररोज वर्दळ असलेल्या व्यापारी संकुलात महिलांसाठी मूलभूत स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसणे ही केवळ गैरसोय नाही, तर सार्वजनिक सुविधांच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

कचरा उचलला, पण समस्या कायम!

काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर गोलाणी मार्केटमधील काही टन कचरा उचलण्यात आला होता. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, कचरा उचलण्याची ही कारवाई कायमस्वरूपी स्वच्छतेच्या व्यवस्थेत रूपांतरित झाली का, हा प्रश्न आजही कायम आहे.

कारण एका दिवसांची स्वच्छता मोहीम राबवून प्रश्न सुटत नाही. कचरा निर्माण होतो, तो वेळेवर उचलला जातो का, त्याची नियमित विल्हेवाट लावली जाते का आणि मार्केट परिसराची दैनंदिन स्वच्छता कोणत्या पद्धतीने केली जाते, यावर ठोस व्यवस्था असणे आवश्यक आहे.

जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असतील, तर केवळ एकदा कचरा उचलून प्रशासनाने आपली जबाबदारी संपली असे मानणे योग्य ठरणार नाही.

चार मजली मार्केट; लिफ्ट मात्र बंद!

गोलाणी मार्केटची रचना चार मजली आहे. मार्केटच्या विविध मजल्यांवर दुकाने तसेच शासकीय कार्यालय सुद्धा आहेत. व्यापाऱ्यांना,ग्राहकांना सातत्याने वर-खाली जावे लागते. मात्र, लिफ्टची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

लिफ्टची सुविधा असतानाही ती बंद असेल तर ती सुविधा कागदावरच असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच जड मालाची ने-आण करणारे व्यापारी व कामगार यांच्यासाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरते.

कर घेणाऱ्या महापालिकेने सुविधा देणेही अपेक्षित!

गोलाणी मार्केटमधील दुकानदार महापालिकेला विविध प्रकारचे कर आणि शुल्क भरतात. त्यामुळे कर वसूल करताना महापालिका तत्पर असते, तर त्याच करातून मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, शौचालये, लिफ्ट आणि मार्केटची देखभाल याकडे दुर्लक्ष का, असा थेट सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

महापालिकेच्या तिजोरीत कररूपाने पैसा जमा होतो; मग त्या बदल्यात नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा कुठे आहेत, याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

१७ मजली इमारतीच्या सावलीत चार मजली मार्केटची उपेक्षा का?

जळगाव महापालिकेची प्रशस्त १७ मजली प्रशासकीय इमारत गोलाणी मार्केटच्या लगतच आहे. त्यामुळे मार्केटमधील समस्या प्रशासनाच्या नजरेपासून लपलेल्या आहेत, असे म्हणण्याचे कारण नाही.

प्रशासनाच्या अगदी डोळ्यांसमोर असलेल्या मार्केटमध्ये शौचालयांना कुलूप, लिफ्ट बंद आणि कचऱ्याचे ढीग दिसत असतील, तर ही केवळ व्यवस्थेची त्रुटी आहे की प्रशासनाच्या प्राधान्यक्रमाचा प्रश्न?

हा प्रश्न आता जळगावकरांनीच विचारण्याची वेळ आली आहे.

गोलाणी मार्केटला ‘दुरुस्ती’ नव्हे, कायमस्वरूपी व्यवस्थेची गरज

गोलाणी मार्केट हे केवळ काही दुकानांचे संकुल नाही. शहराच्या आर्थिक आणि व्यापारी व्यवहारातील त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे येथील समस्या अधूनमधून कचरा उचलून किंवा एखादी तात्पुरती कारवाई करून संपणार नाहीत.

महापालिकेने बंद शौचालये तातडीने सुरू करणे, महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ सुविधा उपलब्ध करणे, लिफ्ट कार्यान्वित करणे, नियमित स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे आणि मार्केटच्या संपूर्ण देखभालीचे वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे.

कर भरायचा व्यापाऱ्यांनी आणि सुविधा मागण्यासाठीही प्रशासनाच्या दारात उभे राहायचे?

जळगाव शहर स्मार्ट, विकसित आणि आधुनिक बनविण्याच्या घोषणा केल्या जात असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये नागरिकांना शौचालय, स्वच्छता आणि लिफ्टसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

गोलाणी मार्केटकडे आता तात्पुरत्या उपायांनी नव्हे, तर जबाबदारीने आणि कायमस्वरूपी उपाययोजनेने पाहण्याची गरज आहे. अन्यथा १७ मजली इमारतीतून शहराचा कारभार चालवणाऱ्या प्रशासनाच्या अगदी शेजारी चार मजली मार्केटची ही अवस्था जळगावच्या विकासाच्या दाव्यांना आरसा दाखवत राहील.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed