३२ वर्षीय उषा साळुंखे हत्या प्रकरणाचा निकाल; दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५ हजारांचा दंड
भुसावळ | राजेश तायडे
भुसावळ येथील बहुचर्चित उषा साळुंखे खून प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पती अनिल रतन साळुंखे (वय ३८) आणि नणंद सुनिता देवराम पवार (वय ४०) यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ सह ३४ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे.
न्यायालयाने प्रत्येक आरोपीला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली असून, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची साधी कैद भोगावी लागणार आहे.
अपस्माराचा झटका आल्याचा बनाव
ही घटना २८ जुलै २०१७ रोजी उघडकीस आली होती. सुरुवातीला उषा साळुंखे यांचा मृत्यू अपस्माराचा झटका आल्याने झाल्याचे भासवण्यात आले होते. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, तपासादरम्यान या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास केला. तत्कालीन तपासाधिकारी तथा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल (IPS) यांच्या तपासात हा नैसर्गिक मृत्यू नसून मारहाणीतून झालेला खून असल्याचे निष्पन्न झाले.
लाकडी फाट्याने मारहाण केल्याचा तपासात निष्कर्ष
पोलिसांच्या तपासानुसार, उषा साळुंखे यांच्या चारित्र्यावर संशय घेत पती अनिल साळुंखे आणि नणंद सुनिता पवार यांनी संगनमताने लाकडी जळाऊ फाट्याने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्राव झाल्याने उषा साळुंखे यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले.
गुन्ह्याचे गांभीर्य लपविण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात पाठवून चुकीची माहिती देण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या खटल्याच्या तपासापासून ते न्यायालयीन कामकाजापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली खटल्याचा पाठपुरावा करण्यात आला.
साक्षीदारांचे पर्यवेक्षण आणि न्यायालयीन कामकाजासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहकार्य केले.
सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद
न्यायालयात सरकारतर्फे ॲड. व्ही. डी. खडसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार हेमराज झटके यांनी न्यायालयीन कामकाजाचा पाठपुरावा केला.
अखेर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
निकालाचे महत्त्व
सुमारे नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, तपासाची दिशा बदलत पोलिसांनी मृत्यूमागील कारणांचा सखोल तपास केला आणि प्रकरण न्यायालयापर्यंत नेले. अखेर दोन्ही आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने या बहुचर्चित प्रकरणाचा न्यायालयीन टप्पा महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचला आहे.














