६५ हजार रुपयांचा संशयित खवा ताब्यात; जळगावातील कोणत्या मिठाई व्यावसायिकासाठी आणला होता, याचा शोध सुरू
जळगाव | The Citizen Mirror
दिवाळीचा सण जवळ येत असताना मिठाईच्या बाजारपेठेत भेसळखोर सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संशयित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जळगावात धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात आणण्यात आलेला तब्बल २४० किलो संशयित खवा प्रशासनाच्या पथकाने जप्त केला आहे. या खव्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
ट्रॅव्हल्स कार्यालयाबाहेर साठा येताच FDA ची धडक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच काळात गुजरातमधील अहमदाबाद येथून संशयास्पद खव्याचा साठा जळगावात आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकाने शहरातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाबाहेर तपासणी केली. यावेळी २४० किलो संशयित खव्याचा साठा आढळून आला. पथकाने तातडीने हा संपूर्ण साठा ताब्यात घेतला.
प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष
जप्त करण्यात आलेल्या खव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या खव्यामध्ये भेसळ आहे किंवा तो बनावट आहे का, हे स्पष्ट होणार आहे. अहवालात दोष सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जळगावातील तो मिठाई विक्रेता कोण?
या कारवाईतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. अहमदाबादहून आणलेला हा खवा जळगावातील नेमक्या कोणत्या व्यापाऱ्याने किंवा मिठाई विक्रेत्याने मागवला होता? सणासुदीच्या काळात नागरिकांच्या ताटात जाणाऱ्या मिठाईच्या गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार?
या खव्याचा पुरवठा कोणाला होणार होता, त्यामागील व्यापारी साखळी कोणती आहे आणि यापूर्वीही अशाच प्रकारे संशयित खव्याचा पुरवठा झाला आहे का, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
नागरिकांनी मिठाई खरेदी करताना सावध राहावे
दिवाळीच्या आनंदावर भेसळीचे सावट येऊ नये, यासाठी नागरिकांनी अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खवा व मिठाई खरेदी करावी. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय आल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, केवळ २४० किलो खवा जप्त करून कारवाई थांबता कामा नये. या साठ्याचा मूळ पुरवठादार, जळगावातील खरेदीदार आणि संभाव्य वितरण साखळीपर्यंत तपास पोहोचणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.














