सामाजिक न्याय, समता आणि स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार; जळगाव जिल्हा कार्यालयात अभिवादन
The Citizen Mirror | जळगाव
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात आज छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनात असलेले महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि बहुजन कल्याणासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म, स्वराज्य आणि राष्ट्ररक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटील, माजी महानगर अध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे महानगर अध्यक्ष एस. डी. पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जळगाव शहर विधानसभा प्रमुख राजुभाऊ मोरे, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील भैय्या माळी तसेच कार्यालय मंत्री सतीश चौव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालत सामाजिक समता, लोककल्याण आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने दोन्ही महापुरुषांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.













