४० दिवसांनी उलगडले ८५ वर्षीय महिलेच्या बेपत्ता होण्याचे गूढ; दागिन्यांसाठी मावशीचा खून केल्याचा भाच्यावर आरोप

जळगावजवळील कानळदा फाट्याच्या सिमेंटच्या चारीत सापडला मृतदेह; LCBच्या तपासात धक्कादायक बाबी समोर जळगाव | The Citizen Mirror Crime Desk जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांनी उलगडा झाला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी सख्ख्या भाच्यानेच मावशीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी…

जळगावजवळील कानळदा फाट्याच्या सिमेंटच्या चारीत सापडला मृतदेह; LCBच्या तपासात धक्कादायक बाबी समोर

जळगाव | The Citizen Mirror Crime Desk

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांनी उलगडा झाला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी सख्ख्या भाच्यानेच मावशीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीनंतर जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळील सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीतून वैजंताबाई गणपत माळी यांचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला.

३ ऑगस्टला अचानक बेपत्ता

करंजी बु. येथे एकट्या राहणाऱ्या वैजंताबाई माळी या ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे आठ वाजता अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या चुलत पुतणे भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांच्या खबरीवरून ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली.

वृद्ध महिलेच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने असल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामागे घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी गृहीत धरली. त्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

२५० किलोमीटर परिसरात शोध; १५० सीसीटीव्ही तपासले

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली. एका पथकाने संशयिताचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकाने बेपत्ता महिलेचा शोध सुरू ठेवला.

पारोळा, करंजी, अमळनेर, धरणगाव, धुळे, मुक्ताईनगर, यावल ते जळगाव अशा विस्तृत परिसरात तपास करण्यात आला. सुमारे २५० किलोमीटरच्या परिसरातील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

तपासादरम्यान ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१६ वाजता प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्या घराच्या अंगणात त्यांच्याशी बोलताना दिसून आला. त्यानंतर काही वेळाने वैजंताबाई एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून जाताना आढळल्या. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांचा संशय प्रशांत माळी याच्यावर केंद्रित झाला.

‘नातेवाईकाचा मृत्यू झाला’ सांगून मावशीला कारमध्ये बसवले

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत माळी याच्यावर मोठे कर्ज होते. यापूर्वी त्याने मावशीकडून पैसे घेतले होते. मात्र, आणखी पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

३ ऑगस्ट रोजी त्याने ‘शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला असून तेथे जायचे आहे’ असे सांगून वैजंताबाईंना भाड्याच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात दिवसभर त्यांना कारमधून फिरवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याचदरम्यान दागिने देण्याची मागणी करण्यात आली; मात्र वैजंताबाईंनी त्याला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

धुळे परिसरात हत्या; जळगावजवळ मृतदेहाची विल्हेवाट

पोलिस तपासानुसार, ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर कार थांबवून रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून वैजंताबाईंची हत्या करण्यात आली.

त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळी जळगावजवळील कानळदा फाट्याच्या परिसरात सर्व्हिस रोडलगत असलेल्या सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकल्याचे तपासात समोर आले आहे.

काही दागिने विकले; उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरातील सोनारांना विकले आहेत. तर उर्वरित दागिने फागणे परिसरात लपवून ठेवल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरी गेलेल्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

४० दिवसांच्या तपासानंतर संशयित अटकेत

या प्रकरणात सुरुवातीला भैय्यासाहेब रोकडे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खुनासह पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील कलमांची वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली LCB आणि पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पारोळा पोलिसांकडून सुरू आहे.

नातेवाईकांवरही विश्वास ठेवताना सावधानतेचा इशारा

या घटनेने केवळ एका वृद्ध महिलेच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आणला नाही, तर जवळच्या नात्यातील व्यक्तीकडूनच आर्थिक किंवा मौल्यवान वस्तूंच्या लालसेपोटी गुन्हा घडू शकतो, ही गंभीर बाबही अधोरेखित केली आहे. विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed