We're open Closes at 5:00 pm

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा गोदाम म्हणून वापर? मुक्ताईनगर नगरपंचायतीत गैरव्यवस्थेचा आरोप; युवक काँग्रेसची चौकशीची मागणी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकृत कार्यालयाचा सिमेंट व इतर बांधकाम साहित्याच्या गोदामाप्रमाणे वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ॲड.चेतन रविंद्र झनके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनानुसार, नगरपंचायतीच्या नव्या इमारतीत मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या अधिकृत कार्यालयीन कक्षात…

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकृत कार्यालयाचा सिमेंट व इतर बांधकाम साहित्याच्या गोदामाप्रमाणे वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ॲड.चेतन रविंद्र झनके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, नगरपंचायतीच्या नव्या इमारतीत मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या अधिकृत कार्यालयीन कक्षात सिमेंटच्या पोत्यांचा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत कक्षात बसून कामकाज करता येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी त्यांना नगराध्यक्षांच्या कक्षात बसून दैनंदिन कामकाज करावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे नागरिक, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना मुख्याधिकाऱ्यांशी गोपनीय अथवा प्रशासकीय विषयांवर स्वतंत्रपणे चर्चा करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यालयीन जागेचा अशा प्रकारे वापर केल्याने प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात कार्यालयातील गळती, कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि नागरिकांना स्वतंत्र भेट व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा गोदाम म्हणून होणारा वापर तात्काळ बंद करावा.
सिमेंट व इतर साहित्य सुरक्षित गोदामात हलवावे.
मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत कार्यालयातून नियमित कामकाज करावे.
नागरिकांना गोपनीय भेटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

कार्यालयातील गळतीची तातडीने दुरुस्ती करावी.


या निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हाधिकारी तसेच उपसंचालक (सामान्य प्रशासन), जळगाव यांनाही माहिती व आवश्यक कारवाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
नगरपंचायत प्रशासन या आरोपांवर काय भूमिका घेते आणि या प्रकरणाची चौकशी होते का, याकडे आता मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागले आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News