फैजपूर | सलिम पिंजारी
फैजपूर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या तडवी वाड्यातील हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी नगरपरिषदेमार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
माहितीनुसार, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील खंडेराव वाडी आणि सतपथी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याचाही प्रस्तावात समावेश करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हजरत मरदान शाह वली बाबा दर्गा हा फैजपूरमधील श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात उर्स सोहळा भरविण्यात येतो. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. दर्ग्याचे धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या मागणीला शहरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, धार्मिक वारशाचे जतन, भाविकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, नगरपरिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत या मागणीवर चर्चा होणार का आणि शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे फैजपूरकरांचे लक्ष लागले आहे.














