भुसावळ | राजेश तायडे
हातउसनवारीने घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना भुसावळ शहरातील भोई नगर परिसरात घडली. या घटनेत बाप-लेकाला शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी रॉडने प्रहार करून एकाला जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू उर्फ उमेश रमेश भोई (वय ३२, रा. मथुरा अपार्टमेंट, भोई नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता भोई नगर परिसरात हातउसनवारीने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून वाद झाला.
या वादातून संशयित आरोपी नितीन भोई आणि पवन भोई, दोघेही रा. भोई नगर, भुसावळ, यांनी पप्पू भोई आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांना चापटबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीदरम्यान संशयितांनी लोखंडी असारी (रॉड)ने पप्पू भोई यांच्या डाव्या हातावर प्रहार करून त्यांना जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पप्पू भोई यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये नितीन भोई व पवन भोई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख करीत आहेत.














