,

शांताराम जाधवांच्या नियुक्तीनंतर ‘घरवापसी’ची चर्चा; विविध पक्षांचे झेंडे खाली ठेवून कार्यकर्ते पुन्हा बसपच्या झेंड्याखाली

जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; बसपसमोरील संघटनात्मक आव्हाने कायम भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror Political Desk बहुजन समाज पार्टीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी शांताराम जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर भुसावळसह जिल्ह्यातील पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे काही काळापासून विविध राजकीय पक्षांच्या संपर्कात असलेल्या किंवा त्या पक्षांचे झेंडे…

जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; बसपसमोरील संघटनात्मक आव्हाने कायम

भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror Political Desk

बहुजन समाज पार्टीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी शांताराम जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर भुसावळसह जिल्ह्यातील पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे काही काळापासून विविध राजकीय पक्षांच्या संपर्कात असलेल्या किंवा त्या पक्षांचे झेंडे हाती घेतलेल्या काही कार्यकर्त्यांनी पुन्हा बसपच्या झेंड्याखाली येण्याची भूमिका घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

जिल्हाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर शांताराम जाधव यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यामुळे गेल्या काही काळापासून संघटनात्मकदृष्ट्या अडचणींचा सामना करणाऱ्या बसपला नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुन्हा संघटन उभे करण्याची संधी निर्माण झाली आहे.

२५-३० वर्षांची नाळ पुन्हा जोडणार?

भुसावळ परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बहुजन समाज पार्टीसाठी काम केल्याचे सांगितले जाते. मात्र, पक्षाची राजकीय स्थिती, संघटनातील अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी यामुळे काही कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले.

विविध पक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर अपेक्षित राजकीय भूमिका किंवा स्थान मिळत नसल्याची भावना काही माजी बसप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पक्षाशी असलेली जुनी वैचारिक नाळ आणि कार्यकर्त्यांचे संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत.

शांताराम जाधव यांच्या नियुक्तीनंतर अशा कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

कीर्ती वानखेडेंची पक्षनिष्ठा चर्चेत

या पार्श्वभूमीवर कीर्ती सुरेश वानखेडे यांच्या पक्षनिष्ठेचीही चर्चा होत आहे. बामसेफच्या माध्यमातून संघटनात्मक काम सुरू ठेवत बहुजन समाज पार्टीशी आपली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राखीव महिला जागेवरून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून त्यांनी पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे आंबेडकरी चळवळीतील काही घटकांचे लक्ष वेधले गेले.

भुसावळ नगराध्यक्ष पदावरून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरही प्रश्न

दरम्यान, बहुजन समाज पक्षाची जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी कमकुवत झाल्याने वंचित बहुजन आघाडीकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढला.मात्र, भुसावळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्याने वंचित बहुजन आघाडीला महिला उमेदवार देऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्याची चांगली संधी होती.मात्र, वंचित बहुजन आघाडी ने याबाबत कोणतीही आग्रही भूमिका न घेता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार न दिल्याने वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरही भुसावळमध्ये चर्चा सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत महिला नगराध्यक्षपदासाठी वंचितकडून उमेदवार का देण्यात आला नाही, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

मात्र, या संदर्भातील अधिकृत भूमिका संबंधित पक्षाकडून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

शांताराम जाधवांसमोर मोठे आव्हान

शांताराम जाधव यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली असली तरी त्यांच्यासमोर पक्षाचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करणे, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे, स्थानिक पातळीवरील मतभेद कमी करणे आणि आगामी राजकीय परिस्थितीत पक्षाची स्वतंत्र ओळख मजबूत करणे, ही आव्हाने त्यांच्यासमोर असतील.

बहुजन समाज पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शांताराम जाधव हे या आव्हानांना कशा पद्धतीने सामोरे जातात, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सत्कार सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

शांताराम जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमाला सुधीर जंजाळे, राहुल घोडेस्वार, वाल्मीक देहाडे, उल्हास पगारे, पप्पू तायडे, सुरेश यशोदे, सुभाष लोखंडे, विजय बार्हे, राहुल बनसोडे, संभाजी सोनवणे, ईश्वर खंडारे, मोहन चंदन, अल्बर्ट तायडे, बाळा मोरे, भरत इंगळे, सुबोध गवळी, विजय भालेराव, विलास तायडे, प्रवीण मोरे, राजकिरण निकम, नितेश तायडे, रवी पेंटर, अजय नरवडे, उपेंद्र वाकचौरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन नेतृत्वाच्या नियुक्तीनंतर दूर गेलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा संघटनेत होणारी संभाव्य ‘घरवापसी’ आणि आगामी काळात बसपचे जिल्ह्यातील संघटन कितपत सक्रिय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed