पूज्य सेवा मंडळाच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक आकडे समोर; कर्मचारी संख्येचा स्पष्ट तपशील नसल्याने आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह
जळगाव | The Citizen Mirror Investigative Desk
अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या पूज्य सेवा मंडळाच्या मागील चार वर्षांच्या ऑडिट रिपोर्टमधील आकडेवारीने कर्मचारी वेतनाच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सन २०२१-२२ ते २०२४-२५ या चार आर्थिक वर्षांत ‘Salaries’ च्या नावाने तब्बल ₹६५,५०,९४२ खर्च झाल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद आहे.
मात्र, एवढा मोठा वेतन खर्च दाखविला जात असताना पूज्य सेवा मंडळात प्रत्यक्षात किती कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांची पदे कोणती आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला किती वेतन दिले जाते? याचा स्पष्ट तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
चार वर्षांत वर्षनिहाय वेतन खर्च किती?
ऑडिट रिपोर्टमधील उपलब्ध आकडेवारीनुसार—
२०२४-२५ : ₹१६,३६,९१९
२०२३-२४ : ₹१९,५५,०३३
२०२२-२३ : ₹१७,५५,४१०
२०२१-२२ : ₹१२,०३,५८०
अशा प्रकारे चार वर्षांत एकूण ₹६५,५०,९४२ खर्च ‘Salaries’ च्या नावाखाली दाखविण्यात आला आहे.
कर्मचारी किती, हे मात्र गुलदस्त्यात?
वेतनावर चार वर्षात लाखो रुपयांचा खर्च दाखविण्यात आला असताना, या खर्चामागे नेमकी कर्मचारी संख्या किती आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
पूज्य सेवा मंडळात किती कर्मचारी कार्यरत आहेत?
त्यापैकी किती नियमित आहेत?
किती कर्मचारी कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात आहेत?
प्रत्येकाची नियुक्ती कोणत्या पदावर झाली?
नियुक्तीपत्र देण्यात आले आहे का?
मासिक वेतन किती आहे?
वेतन देताना बँक व्यवहाराचा वापर केला जातो का?
कर्मचाऱ्यांची हजेरी व वेतन नोंदवही उपलब्ध आहे का?
या प्रश्नांची अधिकृत कागदपत्रांसह स्पष्ट माहिती समोर येणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
‘Salaries’च्या ₹६५.५० लाखांमागे नेमकी यंत्रणा कोणती?
ऑडिट रिपोर्टमध्ये खर्चाची रक्कम नमूद असणे आणि त्या खर्चामागील प्रत्येक लाभार्थी, पद, नियुक्ती व वेतनाची पडताळणी होणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत.त्यामुळे ₹६५.५०लाखांचा वेतन खर्च नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांवर आणि कोणत्या कालावधीत झाला, याची पडताळणी करण्यासाठी नियुक्तीपत्रे, कर्मचारी नोंदवही, वेतनपत्रक, हजेरीपत्रक, बँक स्टेटमेंट आणि संबंधित लेखापरीक्षण कागदपत्रांची तपासणी होणे महत्त्वाचे ठरते.
‘घोटाळा’ की केवळ कागदपत्रांचा अभाव? चौकशीशिवाय निष्कर्ष काढणे घाईचे
कर्मचारी संख्या आणि नियुक्तीची कागदपत्रे सार्वजनिकपणे उपलब्ध नसल्याच्या आधारेच आर्थिक घोटाळा झाला, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये ₹६५.५० लाखांचा वेतन खर्च दाखविला असल्याने त्या खर्चामागील कर्मचारी संख्या, नियुक्ती प्रक्रिया आणि प्रत्यक्ष देयके यांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
त्यामुळे संबंधित विश्वस्त मंडळाने कर्मचारी संख्या, पदनिहाय माहिती, नियुक्तीपत्रे आणि चार वर्षांचे वेतन विवरण सार्वजनिक करावे, अशी मागणी होत आहे.
आता या ₹६५.५०लाखांच्या वेतन खर्चामागील संपूर्ण कागदपत्रे समोर येणार का आणि संबंधित विश्वस्त मंडळ या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणार का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
The Citizen Mirror चे थेट प्रश्न
१. पूज्य सेवा मंडळात एकूण किती कर्मचारी आहेत?
२. त्यापैकी किती नियमित व किती तात्पुरते आहेत?
३. सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे का?
४. ₹६५,५०,९४२ वेतन खर्चाची कर्मचारीनिहाय माहिती उपलब्ध आहे का?
५. वेतनाची रक्कम बँक खात्यामार्फत अदा करण्यात आली का?
६. या खर्चाची ऑडिटरने कोणत्या कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली?
७. कर्मचारी हजेरी व वेतन नोंदवहीची स्वतंत्र तपासणी झाली आहे का?या प्रश्नांची उत्तरे कागदोपत्री समोर आल्यासच ₹६५.५० लाखांच्या वेतन खर्चाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.














