जळगाव| The Citizen Mirror Desk
शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या शालेय कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि पोषण आहाराची राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मुले शाळेत जे खातात, तेच त्यांच्या आरोग्याचा पाया घालते. त्यामुळे शाळांमध्ये विक्री होणारे अन्न, स्वच्छता, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, पोषणमूल्ये आणि सुरक्षिततेचे निकष यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. केवळ नियम पाळले जात आहेत का, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या ताटात दर्जेदार आणि सुरक्षित अन्न पोहोचते आहे का, यावर प्रशासनाचे लक्ष असणार आहे.
ही मोहीम केवळ औपचारिक तपासणी नसून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उचललेले ठोस पाऊल मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत भेसळयुक्त दूध, पनीर, खाद्यपदार्थ आणि औषधांवर कठोर कारवाई करून चर्चेत आलेल्या मुंढे यांनी आता थेट शाळांकडे मोर्चा वळवला आहे.
The Citizen Mirror रोखठोक विश्लेषण
सरकारी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात; मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट दर्जाचा आहार, अस्वच्छ स्वयंपाकगृहे आणि निष्काळजीपणा दिसून येतो. अशा परिस्थितीत तपासणीची भीती निर्माण होणे हीच व्यवस्था सुधारण्याची पहिली पायरी ठरू शकते.
पोषण आहार ही केवळ योजना नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे. जर शाळेतील अन्नच सुरक्षित नसेल, तर शिक्षणाच्या गुणवत्तेची चर्चा निरर्थक ठरते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली ही मोहीम केवळ प्रशासनिक कारवाई नसून, मुलांच्या आरोग्याच्या हक्कासाठी उचललेले कठोर पाऊल म्हणून पाहिले जात आहे.














