जळगाव | द सिटिझन मिरर प्रतिनिधी
प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करत लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका ३३ वर्षीय घटस्फोटीत महिलेचे तब्बल आठ महिने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, पीडितेला आपण विवाहित असल्याची माहिती असूनही संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. अखेर लग्नास स्पष्ट नकार मिळाल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली असून इंडो-तिबेटीयन बॉर्डर बटालियन (ITBP) मधील जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, संशयित सोमनाथ सुरेश गोपाळ (रा. चुंचाळे, नाशिक) हा पीडितेच्या बहिणीचा महाविद्यालयीन वर्गमित्र होता. याच ओळखीतून दोघांची भेट झाली आणि नंतर सोशल मीडियावरून संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे भासवत संशयिताने पीडितेचा विश्वास जिंकला.
लग्नाच्या आश्वासनावर आठ महिने अत्याचार
पीडिता घटस्फोटीत असल्याचा फायदा घेत संशयिताने मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “आपण लग्न करू” असे वारंवार सांगत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र वेळ जात असतानाही लग्नाचा विषय सतत टाळला जात असल्याने पीडितेला संशय आला.
अखेर तिने लग्नाबाबत ठाम भूमिका घेताच संशयिताने नकार दिल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याची जाणीव होताच पीडितेने थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
कर्नाटकात ड्युटीवर असल्याची माहिती
तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित सोमनाथ सुरेश गोपाळ याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित हा इंडो-तिबेटीयन बॉर्डर बटालियनमध्ये कार्यरत असून नाशिक येथे पत्नी आणि कुटुंबासह वास्तव्यास आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सध्या कर्नाटक येथे ड्युटीवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
‘प्रेम’ की फसवणूक?
लग्नाचे आश्वासन देऊन महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना हा प्रकार पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न उभा करतो. प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करून महिलांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे हीच काळाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.














