भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत दोन युवा बॉक्सिंग खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. पंजाब राज्यातील फगवाडा येथे १५ ते १९ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी भुसावळच्या ममता कंवर आणि नोमेश्वरी निकम यांची निवड झाली असून त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी (१० जुलै) हमसफर एक्स्प्रेसने नागपूरमार्गे पंजाबकडे रवाना झाल्या.
राष्ट्रीय स्पर्धेत भुसावळचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ममता कंवर या केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थिनी असून नोमेश्वरी निकम या वरणगाव फॅक्टरी येथील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थिनी आहेत. दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
या यशामागे प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ, राकेश सपकाळे, सुमेध शेजवळ आणि राजकिरण निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंना रवाना करताना प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ, केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक प्रियंसिंग निकम, लीलाधरसिंग कंवर, राम जवरे, हरतिश लौढे, सुरेश वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. नंदेश्वर यांनी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देत राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भुसावळ आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने भुसावळ शहरात आनंदाचे वातावरण असून क्रीडाप्रेमींकडून दोन्ही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशस्वी कामगिरीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.














