,

वृद्धाश्रमातून एकटे बाहेर पडले, शेतात मृतावस्थेत सापडले; आता वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न

निर्मल लालचंद मोनानी यांच्या मृत्यूने सिंधी बांधव हादरले; नातेवाईकांची १६ सप्टेंबरला पोलिसांत फिर्याद, सीसीटीव्ही फुटेजने उपस्थित केले अनेक सवाल जळगाव | The Citizen Mirror crime Desk जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले निर्मल लालचंद मोनानी (५७) हे अचानक वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह ममुराबाद ईदगाव रस्त्यावरील आवार शिवारातील एका…

निर्मल लालचंद मोनानी यांच्या मृत्यूने सिंधी बांधव हादरले; नातेवाईकांची १६ सप्टेंबरला पोलिसांत फिर्याद, सीसीटीव्ही फुटेजने उपस्थित केले अनेक सवाल

जळगाव | The Citizen Mirror crime Desk

जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले निर्मल लालचंद मोनानी (५७) हे अचानक वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह ममुराबाद ईदगाव रस्त्यावरील आवार शिवारातील एका शेतात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाची अवस्था पाहता वन्यप्राण्यांनी शरीराचे लचके तोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्प्रया सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. विशेष म्हणजे, The Citizen Mirror ने १५ सप्टेंबर रोजी निर्मल मोनानी हे वृद्धाश्रमातून कोणालाही न सांगता निघून गेल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

नातेवाईकांची फिर्याद

मोनानी यांचे नातेवाईक दयानंद ज्ञानचंद कटारिया यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत निर्मल मोनानी हे १२ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ते आढळून आले नाहीत.

या फिर्यादीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, मोनानी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि ते वृद्धाश्रमातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या हालचाली काय होत्या, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

मात्र सीसीटीव्ही फुटेजने उपस्थित केला वेगळाच प्रश्न

The Citizen Mirror च्या हाती आलेल्या सेवा मंडळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनुसार, निर्मल लालचंद मोनानी हे १३ सप्टेंबर रोजी एकटे बाहेर पडताना दिसत असल्याचे सांगण्यात येते.

यामुळे आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे—

जर मोनानी हे वृद्धाश्रमातून एकटे बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत होते, तर त्यांचा शोध घेताना वृद्धाश्रम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते का?

आणि जर फुटेज तपासण्यात आले असेल, तर त्यातून मोनानी यांच्या हालचाली स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली होती का?

ट्रस्टचे विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीने स्वतःहून फिर्याद का दिली नाही?

वृद्धाश्रमात दाखल असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न या घटनेनंतर प्रकर्षाने समोर आला आहे.

निर्मल मोनानी हे वृद्धाश्रमातून निघून गेल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे लक्षात आले असेल, तर अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टचे विश्वस्त अथवा वृद्धाश्रमाची व्यवस्थापन समिती यांनी स्वतःहून पोलिसांना माहिती देऊन शोधमोहीम सुरू करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही?

जर त्यांनी पोलिसांना माहिती दिली असेल, तर त्याची अधिकृत नोंद काय आहे?

आणि जर माहिती दिली नसेल, तर एका वृद्ध रहिवाशाच्या बेपत्ता होण्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यास विलंब का झाला?

या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित व्यवस्थापनाकडून अपेक्षित आहेत.

१२ सप्टेंबर की १३ सप्टेंबर? तपासात तारखेचा मुद्दाही महत्त्वाचा

या प्रकरणात आणखी एक बाब लक्षवेधी ठरत आहे. नातेवाईकांनी दाखल केलेल्या फिर्यादीत मोनानी हे १२ सप्टेंबरपासून निघून गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, उपलब्ध असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते १३ सप्टेंबर रोजी एकटे बाहेर पडताना दिसत असल्याचे सांगण्यात येते.

म्हणूनच पोलिस तपासात हा कालक्रम स्पष्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.मोनानी नेमके कधी वृद्धाश्रमातून बाहेर पडले?
वृद्धाश्रमातून बाहेर पडल्याची नोंद करण्यात आली होती का?त्यांच्या अनुपस्थितीची माहिती व्यवस्थापनाला नेमकी कधी झाली?
कुटुंबीयांना कधी कळविण्यात आले?
पोलिसांना माहिती देण्यात आली का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.

वृद्धाश्रमातील वृद्धांची जबाबदारी नेमकी कोणाची?

अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टकडून सामाजिक आणि सेवाभावी कार्य केले जाते. असहाय व गरजू वृद्धांना आधार देण्याच्या उद्देशाने वृद्धाश्रम चालविणे ही निश्चितच संवेदनशील जबाबदारी आहे.

मात्र, वृद्धाश्रमात एखादा वृद्ध दाखल झाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ कागदोपत्री राहू शकत नाही.

वृद्धाश्रमातील रहिवाशांची नियमित उपस्थिती तपासली जाते का?
बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवली जाते का?
सीसीटीव्हीचे नियमित निरीक्षण केले जाते का?
वृद्धाश्रमातील एखादा रहिवासी वृद्ध बेपत्ता झाल्यास पोलिसांना कळविण्याची निश्चित कार्यपद्धती आहे का?
नातेवाईकांना तत्काळ माहिती देण्याची व्यवस्था आहे का?

या प्रश्नांची उत्तरे आता केवळ निर्मल मोनानी प्रकरणापुरती मर्यादित राहिलेली नाहीत; ती वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत.

निष्काळजीपणाचा ठपका तपासाआधी नाही; पण जाब तर द्यावाच लागेल

या घटनेच्या आधारे ट्रस्ट किंवा सेवा मंडळ व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केला, असा अंतिम निष्कर्ष काढणे सध्या योग्य ठरणार नाही. त्याची सत्यता पोलिस तपासातूनच स्पष्ट होईल.

मात्र, सीसीटीव्हीमध्ये वृद्ध व्यक्ती एकटे बाहेर पडताना दिसत असल्याची माहिती, त्यानंतर त्यांचा शोध, पोलिसांना माहिती देण्याची प्रक्रिया आणि अखेर शेतात सापडलेला मृतदेह—या संपूर्ण घटनाक्रमाबाबत व्यवस्थापनाने सार्वजनिकपणे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.

विशेषतः नातेवाईकांनी पुढे येऊन पोलिसांत फिर्याद दाखल केली असताना, संबंधित वृद्धाश्रम व्यवस्थापनाने स्वतःहून कोणती पावले उचलली होती, हा प्रश्न अनुत्तरित राहता कामा नये.

निर्मल मोनानी यांच्या मृत्यूचे सत्य पोलिस तपासातून समोर येईलच. मात्र, या घटनेने एक मूलभूत प्रश्न समाजासमोर उभा केला आहे—वृद्धाश्रमात आधारासाठी दाखल झालेल्या वृद्धाची सुरक्षितता धोक्यात आली तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

या प्रश्नाचे उत्तर आता ट्रस्टचे विश्वस्त, सेवा मंडळाचे व्यवस्थापन आणि संबंधित वृद्धाश्रम समिती यांनी द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed