,

रेशनच्या घासावर डल्ला? पाचोऱ्यात २९६ टन संशयास्पद तांदूळ जप्त!

₹७८.६३ लाखांचा साठा एफडीएच्या रडारवर; रेशनच्या फोर्टिफाइड तांदळाचा काळाबाजार की मोठ्या गैरव्यवहाराची नांदी? सहा नमुने प्रयोगशाळेत; आता ‘साठा कुठून आला आणि कुठे जाणार होता?’ हा खरा सवाल पाचोरा | The Citizen Mirror गरिबांच्या ताटात पोहोचणारा रेशनचा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या वाटेने फिरत असेल, तर हा केवळ अन्नधान्याचा गैरव्यवहार नाही—तर गरिबांच्या हक्काच्या घासावरचा संभाव्य डल्ला आहे.…

₹७८.६३ लाखांचा साठा एफडीएच्या रडारवर; रेशनच्या फोर्टिफाइड तांदळाचा काळाबाजार की मोठ्या गैरव्यवहाराची नांदी? सहा नमुने प्रयोगशाळेत; आता ‘साठा कुठून आला आणि कुठे जाणार होता?’ हा खरा सवाल

पाचोरा | The Citizen Mirror

गरिबांच्या ताटात पोहोचणारा रेशनचा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या वाटेने फिरत असेल, तर हा केवळ अन्नधान्याचा गैरव्यवहार नाही—तर गरिबांच्या हक्काच्या घासावरचा संभाव्य डल्ला आहे. पाचोरा तालुक्यातील भवरखेड येथील ‘मे. श्री महासर माता राईस मिल’वर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या सलग तीन दिवसांच्या कारवाईने या संशयाला गंभीर स्वरूप दिले आहे.

७ ते ९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या कारवाईत तब्बल २ लाख ९६ हजार ४७६ किलो म्हणजे सुमारे २९६ टन तांदूळ जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत तब्बल ₹७८ लाख ६३ हजार १५० रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे या साठ्यात ६४,५४६ किलो फोर्टिफाइड राईस आढळला असून, तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अर्थात रेशनच्या तांदळाशी संबंधित आहे का, याचा तपास सुरू आहे. सहा नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा खरा ‘स्रोत’ आणि ‘मार्ग’ शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

‘रेशनचा तांदूळ’ गिरणीत पोहोचतो तरी कसा?

रेशन दुकानातून गरीब लाभार्थ्याच्या ताटापर्यंत पोहोचण्यासाठी असलेला तांदूळ अखेर मोठ्या प्रमाणात राईस मिलमध्ये कसा पोहोचला?

हा तांदूळ रेशन व्यवस्थेतूनच आला असेल तर तो कोणाच्या माध्यमातून बाहेर काढला गेला?

आणि तो रेशनचा नसल्यास—

मग त्याचा अधिकृत स्रोत कोणता?
खरेदीची बिले कुठे आहेत?
वाहतुकीची कागदपत्रे कुठे आहेत?
साठ्याचा हिशेब कुठे आहे?

हे प्रश्न आता केवळ पाचोऱ्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

बिलांचा अभाव; पोत्यांवर लेबलही नाही!

एफडीएच्या तपासणीत मिलमध्ये अस्वच्छ परिस्थितीत तांदूळ साठविल्याचे आढळल्याचे वृत्त आहे. तांदळाच्या साठ्याभोवती उंदरांची विष्ठा, कोळ्यांची जाळी आणि मोठ्या प्रमाणात धूळ आढळली. काही तांदूळ थेट जमिनीवर ठेवण्यात आला होता.

याहून महत्त्वाचे म्हणजे काही पोत्यांवर आवश्यक लेबलिंग अथवा उत्पादकाचा पत्ता नसल्याचेही निदर्शनास आले. जप्त साठ्याच्या खरेदी-विक्रीशी संबंधित अधिकृत बिले सादर करण्यात आली नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

इतका मोठा साठा आणि त्याचा कागदोपत्री हिशेब नाही—हा योगायोग समजायचा की व्यवस्थेतील गंभीर त्रुटी?

२९६ टन तांदळामागे नेमके काय दडले आहे?

जप्त साठ्यात—

  • ६४,५४६ किलो फोर्टिफाइड राईस
  • १,३७,९९६ किलो ब्रोकन राईस
  • ८१,४९६ किलो एक्स्पोर्ट राईस
  • ६,९९६ किलो मलेशिया एक्स्पोर्ट राईस
  • ५,४४२ किलो मिसब्रँडेड/विनालेबल डोमेस्टिक राईस

असा मोठा साठा आढळल्याचे प्रशासनाच्या कारवाईत समोर आले आहे.

यातील तांदळाचा परस्पर संबंध काय? कोणत्या व्यापाऱ्याकडून माल आला? कोणाला विक्री होणार होती? मालाची वाहतूक कोणी केली? त्यासाठी कोणती बिले आणि परवाने वापरण्यात आले?

या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय कारवाई केवळ ‘साठा जप्त’ करण्यापुरती मर्यादित राहू नये.

रेशनचा तांदूळ पॉलिश करून निर्यातीच्या मार्गावर?

प्रशासनाकडून जप्त तांदळाचा काही भाग स्थानिक रेशन व्यवस्थेशी संबंधित आहे का, तसेच तांदूळ पॉलिश अथवा चुकीचे ब्रँडिंग करून निर्यातीसाठी तयार केला जात होता का, याचाही तपास केला जात आहे. मिल केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने कारवाईचा अहवाल संबंधित केंद्रीय प्राधिकरणाकडेही पाठविण्यात आला आहे.

जर हा संशय प्रयोगशाळा आणि कागदपत्रांच्या तपासणीत खरा ठरला, तर प्रकरणाची व्याप्ती केवळ एका राईस मिलपुरती राहणार नाही.

मग प्रश्न असेल—रेशनचा तांदूळ पुरवठा साखळीतील कोणत्या टप्प्यावर ‘गायब’ होतो?

‘गोदाम ते गिरणी’ साखळीची चौकशी होणार का?

या प्रकरणात आता केवळ मिलची तपासणी पुरेशी नाही.

रेशनचा तांदूळ कुठून निघाला?
कोणत्या गोदामातून आला?
कोणाच्या आदेशाने आला?
कोणत्या वाहनाने वाहतूक झाली?
वाहतूक नोंद काय सांगते?
मिलमध्ये किती माल आला आणि किती बाहेर गेला?
पूर्वी अशाच प्रकारचा साठा किती वेळा आला?

या सर्व बाबींची मागील काही महिन्यांची अथवा वर्षांची कागदपत्रे तपासली गेली पाहिजेत.

कारण २९६ टनांचा साठा एका दिवसात निर्माण होत नाही.

प्रयोगशाळेच्या अहवालाकडे आता जिल्ह्याचे लक्ष

एफडीएने सहा नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यामुळे पुढील कारवाईसाठी हा अहवाल निर्णायक ठरू शकतो. मात्र त्याआधीही साठ्याचा स्रोत, मालकी, खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वाहतूक आणि संबंधित पुरवठा साखळी यांची चौकशी तितकीच महत्त्वाची आहे.

The Citizen Mirrorचा थेट सवाल

गरीबांच्या ताटासाठी सरकारकडून उपलब्ध होणारा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या मार्गावर जात असेल, तर दोषी केवळ माल साठविणारा आहे की संपूर्ण पुरवठा साखळीमध्येच कुठेतरी ‘छिद्र’ आहे?

पाचोऱ्यातील कारवाईने एक राईस मिल उघड केली आहे.

आता तपास यंत्रणा त्या मिलपर्यंत थांबणार की या २९६ टन तांदळामागची संपूर्ण साखळी उघडणार—याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

कारवाई झाली हे स्वागतार्ह; पण खरा विजय तेव्हाच मानायचा, जेव्हा या तांदळाचा स्रोत, मालक, पुरवठादार आणि संभाव्य काळाबाजाराची संपूर्ण साखळी जनतेसमोर येईल.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed