,

संपादकीय | घंटागाडीतून मृतदेह… प्रशासनाच्या विवेकाचाही अंत्यसंस्कार झाला का?

The Citizen Mirror | special Editorial अमळनेरमध्ये घडलेली घटना ही केवळ एका बेवारस मृतदेहाच्या वाहतुकीची नाही. ती संपूर्ण प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा, बेफिकीरीचा आणि माणुसकीच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. ज्या घंटागाडीतून रोज शहरातील कचरा उचलला जातो, त्याच वाहनात एका माणसाचा मृतदेह टाकला जातो आणि प्रशासनाला त्यात काहीच गैर वाटत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? मृतदेह बेवारस होता; पण…

The Citizen Mirror | special Editorial

अमळनेरमध्ये घडलेली घटना ही केवळ एका बेवारस मृतदेहाच्या वाहतुकीची नाही. ती संपूर्ण प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा, बेफिकीरीचा आणि माणुसकीच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. ज्या घंटागाडीतून रोज शहरातील कचरा उचलला जातो, त्याच वाहनात एका माणसाचा मृतदेह टाकला जातो आणि प्रशासनाला त्यात काहीच गैर वाटत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?

मृतदेह बेवारस होता; पण माणुसकीही बेवारस झाली होती का?

भारतीय संस्कृतीत मृत्यूला अंतिम सत्य मानले जाते. मृत व्यक्तीचा सन्मान हा धर्म, जात, संपत्ती किंवा नातेसंबंधांवर अवलंबून नसतो. बेवारस असो वा अब्जाधीश—मृतदेहाला सन्मानाने अंतिम निरोप देणे ही प्रत्येक प्रशासनाची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे. पण अमळनेरमध्ये एका माणसाला कचऱ्याइतकीही किंमत मिळाली नाही.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन वापरण्याचे स्पष्ट आदेश असतानाही त्यांची उघडपणे पायमल्ली झाली. म्हणजेच हा अपघात नव्हता, तर नियम, कायदा आणि माणुसकी या तिन्हींची जाणीवपूर्वक हत्या होती.

आता पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विभागीय चौकशी सुरू झाली आहे. काहींवर कारवाईचा प्रस्ताव गेला आहे. पण हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही—माध्यमांनी हा प्रकार उघड केला नसता, तर ही कारवाई झाली असती का?

दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. त्या क्षणी प्रशासन कुठे होते? संबंधित अधिकारी काय करत होते? वरिष्ठांनी जबाबदारीची चौकशी का केली नाही? की सगळ्यांना हा प्रकार “सामान्य” वाटत होता?

आता ठेकेदारावर गुन्हा, चालकावर गुन्हा, सुपरवायझरवर गुन्हा, निरीक्षकावर शिस्तभंग… पण एवढ्याने प्रशासनाची जबाबदारी संपते का? निर्णय घेणारे, देखरेख करणारे, आदेशांची अंमलबजावणी तपासणारे वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे निर्दोष कसे? की सरकारी व्यवस्थेत नेहमीप्रमाणे लहान कर्मचाऱ्यांना पुढे करून मोठे अधिकारी स्वतःची सुटका करून घेणार?

ही घटना एका नगरपरिषदेपुरती मर्यादित नाही. ही संपूर्ण स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या मानसिकतेचे भयावह चित्र आहे. जिथे फाईलवरील सही महत्त्वाची आणि माणसाचे आयुष्य गौण झाले आहे. जिथे नियम फक्त चौकशी समित्यांसाठी असतात आणि जबाबदारी नेहमी दुसऱ्यावर ढकलली जाते.

The Citizen Mirror चे स्पष्ट मत आहे की, या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करून किंवा कारणे दाखवा नोटीस देऊन न्याय होणार नाही. या घटनेची न्यायालयीन किंवा स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण साखळीतील प्रत्येक अधिकाऱ्याची भूमिका तपासली पाहिजे. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. दोषींना केवळ निलंबित नव्हे, तर कायदेशीर शिक्षाही झाली पाहिजे.

जर बेवारस मृतदेहाला कचऱ्याच्या वाहनात टाकले जात असेल, तर उद्या एखाद्या गरीब, असहाय नागरिकाच्या मृतदेहाबाबतही अशीच वागणूक दिली जाणार नाही, याची खात्री कोण देणार?

प्रशासनाने हे लक्षात ठेवले पाहिजे—बेवारस असणे हा गुन्हा नाही; पण बेवारस मृतदेहाचा अपमान करणे हा समाजाविरुद्धचा अपराध आहे.

लोकांच्या करातून पगार घेणाऱ्या यंत्रणेने जर माणुसकीच कचराकुंडीत फेकली, तर अशा यंत्रणेला लोकशाहीत स्थान नाही.

या घटनेत मृत्यू एका व्यक्तीचा झाला; पण अंत्यसंस्कार झाले ते प्रशासनाच्या संवेदनांचे, उत्तरदायित्वाचे आणि नैतिकतेचे.

अमळनेरमधील हा काळा अध्याय विसरला जाऊ नये. कारण जर समाज आज गप्प राहिला, तर उद्या प्रत्येक बेवारस माणूस कचऱ्याच्या गाडीतूनच शेवटचा प्रवास करेल… आणि त्यावेळी मृतदेह नव्हे, तर आपल्या समाजाचे अंतरात्माच वाहून नेले जात असेल.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed