रावेर| नजमोद्दीन शेख
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवादादरम्यान कथितरित्या आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई), वाईस ऑफ मीडिया आणि फैजपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.
सोमवारी (दि. २९ जून) पत्रकारांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत फैजपूर येथील प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन सादर केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) कार्यालय आणि सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनाही निवेदन देण्यात आले.
. सोमवारी (दि. २९ जून) पत्रकारांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत फैजपूर येथील प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन सादर केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) कार्यालय आणि सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनाही निवेदन देण्यात आले.
“पत्रकारितेवर दबाव खपवून घेतला जाणार नाही”
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आणि वस्तुनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचवणे ही पत्रकारांची मूलभूत जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांविषयी कथित अपमानास्पद भाषा वापरणे किंवा धमकी देणे ही गंभीर बाब असून त्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले.
सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणीही पत्रकार संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.
मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती
या आंदोलनात सलीम पिंजारी, नजमोद्दीन शेख,संतोष नवले, योगेश सैतवाल, दिलीप वैद्य, राजीव बोरसे, मिलिंद टोके, प्रमोद कोंडे, दिलीप भारंबे, फारुख शेख अमीर, अजहर खान, प्रदीप कुलकर्णी, राजेश चौधरी, मलिक मुसा, प्रकाश पाटील, युनूस पिंजारी, पी. के. चौधरी, संतोष बारी, कैलास लवंगडे, संजय बारी, भूषण सोनवणे, किरण पाटील, इस्माईल पिंजारी, शेख फरीद, युसुफ शाह, ललित चौधरी, जुम्मा तडवी, राजू तडवी, , ललितकुमार फिरके यांच्यासह परिसरातील अनेक पत्रकार सहभागी झाले.














