भुसावळ | राजेश तायडे
“विज्ञानवादी विचार सांगणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा खून कोणत्याही तंत्र-मंत्राने झाला नाही, तर विज्ञानाने तयार केलेल्या बंदुकीने त्यांचा खून करण्यात आला. यातच त्यांच्या मारेकऱ्यांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे,” अशी परखड भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर यांनी मांडली.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात तंत्र-मंत्र, कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेले प्रकार हे मानवाला अज्ञानात ठेवण्याचे आणि त्याचे शोषण करण्याचे माध्यम असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले. समाजातील अंधविश्वास दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी डॉ. दाभोळकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, त्यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी विज्ञानानेच विकसित केलेल्या शस्त्राचा वापर केला, ही बाब त्यांच्या विचारांच्या विरोधकांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“एक दाभोळकर गेले, हजारो दाभोळकर उभे राहिले”
“एक दाभोळकर गेले म्हणून काय झाले? त्यांच्या विचारांचे हजारो दाभोळकर त्यांनी निर्माण करून ठेवले आहेत. पुढे या विचारांचे लाखोंमध्ये रूपांतर होईल, यात शंका नाही,” असा विश्वास बाविस्कर यांनी व्यक्त केला.
कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक व आर्थिक तसेच सामाजिक शोषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भोंदू बाबांवर कारवाईचा अभाव असल्याचा आरोप
भोंदू बाबा आणि तथाकथित आध्यात्मिक व्यक्तींच्या दरबारात राजकीय नेते, अधिकारी, पोलीस अधिकारी, उद्योगपती यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती जात असल्याचा उल्लेख करत बाविस्कर यांनी अशा प्रवृत्तींवर प्रश्न उपस्थित केला.
कॅप्टन अशोक खरात यांचा संदर्भ देत त्यांनी गंभीर आरोप केले. अशा कथित भोंदू बाबांवर वेळीच कठोर कारवाई झाली असती तर महिलांचे शोषण रोखता आले असते, असा दावा त्यांनी केला. “महिलांचे शोषण होत असताना जबाबदारी कोणाची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज
अंधश्रद्धा पसरविणाऱ्या तथाकथित शास्त्री, ज्योतिष आणि भोंदू बाबांचे प्रकार आजही सुरू असून भोळ्याभाबड्या नागरिकांना अंधविश्वासाच्या दरीत ढकलले जात असल्याचे बाविस्कर म्हणाले.
अशा प्रवृत्तींवर शासनाने लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करावी. अंधश्रद्धेमुळे समाजात जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याचीही शासनाने दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दाभोळकरांना अभिवादन
स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात तालुक्याचे शहराध्यक्ष रवींद्र अहिरे, शांताराम जाधव, सिद्धार्थ सोनवणे, निरंजना तायडे आणि सुभाष लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त करून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन केले.
यावेळी पत्रकार तथा संस्थेचे सदस्य राजेश तायडे, प्रेम परदेशी, नरेंद्र वाघ, विजय साळवे, ज्योती घोडेश्वार, मौसमी मुखर्जी, रिना पाल आणि शारदा जवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अरुण दामोदर यांनी केले.














