वारंवार निवेदने देऊनही प्रश्न जैसे थे; अखेर नागरिकांचे लक्षवेधी निवेदन मंत्री संजय सावकारे यांच्याकडे
भुसावळ | राजेश तायडे
भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध समस्यांबाबत नगरपालिका प्रशासनाकडे निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आता थेट मंत्री संजय सावकारे यांच्याकडे धाव घेतली आहे.
प्रभागातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह तयार करण्यात आलेल्या लक्षवेधी निवेदनाची प्रत मंत्री सावकारे यांच्याकडे स्थानिक शिष्टमंडळाने सादर केली. यामुळे प्रभागातील नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गटारी तुंबल्या, दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक ठिकाणच्या गटारींची गेल्या कित्येक वर्षांपासून नियमित साफसफाई झालेली नाही. परिणामी गटारी तुडुंब भरल्या असून सांडपाणी आणि घाणीमुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गटारींची नियमित साफसफाई करावी, परिसरात औषध फवारणी करावी आणि आरोग्य विभागामार्फत नागरिकांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्ष आणि गटनेत्यांकडेही निवेदन
प्रभागातील समस्यांबाबत गेल्या आठवड्यात मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रभारी नगराध्यक्ष शैलेश नारखेडे आणि गटनेते युवराज लोणारी यांच्याकडे नागरिकांनी निवेदन सादर केले होते. समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली.
मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आता मंत्री संजय सावकारे यांच्याकडे लक्षवेधी निवेदन सादर केले आहे.
‘नियमित स्वच्छता आणि आरोग्य तपासणी करा’
प्रभागातील गटारींची नियमित स्वच्छता, औषध फवारणी तसेच आरोग्य विभागाकडून परिसराची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात तुंबलेल्या गटारींमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
आता मंत्री सावकारे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रभाग क्रमांक १७ मधील या समस्या मार्गी लागतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदनांपुरतेच प्रशासनाचे कामकाज मर्यादित राहणार की प्रत्यक्ष मैदानात स्वच्छता आणि नागरी सुविधांची कामे सुरू होणार?, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात
राजू चौधरी, मोहम्मद अबिद, शेख फैयाज, अहमद खान, दीपक सुरपाटणे, डॉ. नईम शेख, क्यू.एम. काझी, हुस्नोद्दीन शेख, फिरोज शेख, नसीम खान, ॲड. प्रशांत जाधव, केशव पाटील, मकबुल शेख, माजीद जबाब आणि बहादूर शेख यांचा समावेश होता.














