अपूर्ण पुलामुळे गर्भवतीचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रसूती झाली, पण सातपुड्यातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधांवर पुन्हा गंभीर प्रश्न
तळोदा | प्रतिनिधी
एका गर्भवती महिलेची प्रसूती सुरक्षित झाली, ही दिलासादायक बाब आहे. पण त्या सुखरूप शेवटापर्यंत पोहोचण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेला संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील टाकळी गावात अपूर्ण पुलामुळे एका गर्भवतीला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी आधी बांबूच्या झोळीतून, त्यानंतर मालवाहतूक वाहनातून आणि शेवटी रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला. या घटनेने विकासाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
टाकळी गावाजवळील निझरा नदीवरील पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. दरम्यान, महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांसमोर वेळेशी स्पर्धा करण्याशिवाय पर्याय नव्हता.
महिलेला बांबूची झोळी तयार करून त्यात बसविण्यात आले. नातेवाईकांनी जवळपास दोन किलोमीटर अंतर पायी चालत, नदीपात्र ओलांडत तिला दुसऱ्या बाजूला नेले. त्यानंतर खराब रस्त्यामुळे खासगी मालवाहतूक वाहनाची मदत घेण्यात आली. अखेर रुग्णवाहिका उभी असलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. सुदैवाने महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मात्र, या घटनेने सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून किती वंचित आहेत, याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पुलाचे काम वर्षानुवर्षे रखडल्याने नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. एखाद्या गर्भवतीला रुग्णालयात पोहोचण्यासाठी अशा प्रकारे जीवाशी खेळावे लागणे, ही केवळ एका गावाची नव्हे तर संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाची वेदनादायक कहाणी आहे.
तळोदा हा आदिवासीबहुल तालुका असून सातपुड्याच्या दुर्गम भागात अशा घटना नित्याच्याच बनल्या आहेत. कधी रस्ता नसल्याने, तर कधी अपूर्ण पुलांमुळे रुग्णांचे हाल होतात. अनेक वर्षांपासून समस्या कायम असतानाही संबंधित विभागांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
टाकळीतील ही घटना केवळ एका गर्भवतीच्या जीवघेण्या प्रवासाची नाही, तर दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थेचा आरसा आहे. आता तरी अपूर्ण पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून अशा घटना कायमच्या थांबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.














