मुक्ताईनगरात थरारक अपघात टळला! भरधाव ट्रॅक्टर रिव्हर्स घेताच कारवर चढली ट्रॉली; युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. चेतन झनके थोडक्यात बचावले

मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात रस्ता दुभाजकाच्या कामादरम्यान सोमवारी दुपारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राध्यक्ष ॲड. चेतन झनके आणि त्यांचे बंधू विशाल झनके यांच्या कारवर रिव्हर्स घेतलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली चढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. चेतन झनके आणि विशाल झनके हे मलकापूर…

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात रस्ता दुभाजकाच्या कामादरम्यान सोमवारी दुपारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राध्यक्ष ॲड. चेतन झनके आणि त्यांचे बंधू विशाल झनके यांच्या कारवर रिव्हर्स घेतलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली चढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. चेतन झनके आणि विशाल झनके हे मलकापूर येथून काम आटोपून मुक्ताईनगरकडे येत होते. दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास महाजन पेट्रोल पंपासमोरील बोदवड रोडवर रस्ता दुभाजकाचे काम सुरू होते. त्याचवेळी पुढे असलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने जाऊन अचानक थांबला.

झनके बंधूंनी सुरक्षित अंतर ठेवत आपली व्हर्ना कार (MH-19-BU-8704) ट्रॅक्टरच्या मागे थांबवली होती. मात्र, ट्रॅक्टर चालकाने मागील वाहतुकीचा कोणताही अंदाज न घेता अचानक ट्रॅक्टर रिव्हर्स घेतला. झनके बंधूंनी सतत हॉर्न वाजवून चालकाला इशारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाच्या कानात हेडफोन असल्याने त्याला हॉर्नचा आवाज ऐकूच आला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

परिस्थिती अधिक गंभीर बनली कारण कारच्या मागे ट्रक उभा असल्याने कार मागे घेण्याची कोणतीही संधी नव्हती. परिणामी ट्रॅक्टरची ट्रॉली थेट कारवर चढली. ट्रॉलीचे चाक कारच्या बोनेटवर चढून पुढे सरकत विंडशील्डपर्यंत पोहोचले. ट्रॉली आणि कारमधील अंतर अवघे अर्धा फूट उरल्याने मोठी जीवितहानी टळली.

अपघातानंतर ॲड. चेतन झनके यांनी शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “यापूर्वीही बऱ्हाणपूर रोडवर भरधाव डंपरच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू झाला होता. अशा घटना सातत्याने घडत असताना प्रशासन आणि पोलिसांनी अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. आणखी एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्थानिक नागरिकांनीही शहरातील सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान वाहतूक नियोजन, अवजड वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण आणि पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed