फैजपूर | सलिम पिंजारी
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा फैजपूर शहरात रविवारी उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच फैजपूर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे ३,८०० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मोहिमेचा शुभारंभ शहरातील विविध पोलिओ बूथवर करण्यात आला. तहानगर येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे आयोजित पोलिओ बूथवर प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. तसेच अन्य पोलिओ बूथवर आरोग्य सभापती हकीम ऐमत तडवी यांच्या हस्तेही बालकांना लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी फैजपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती दामिनीताई पवन सराफ यांनी पोलिओ बूथला भेट देत आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले. लहान बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना पोलिओचा डोस देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
१६ पोलिओ बूथ, २ ट्रांझिट टीम आणि मोबाईल पथक कार्यरत
या मोहिमेसाठी फैजपूर शहरात आरोग्य विभागाने १६ पोलिओ बूथ, २ ट्रांझिट टीम आणि १ फिरस्ती (मोबाईल) टीम कार्यरत केली आहे. या मोहिमेत ५४ स्वयंसेवक आणि ३ पर्यवेक्षक सेवा बजावत असून, डॉ. खाचाने नर्सिंग महाविद्यालयाच्या ११ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा सहभाग
या प्रसंगी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सय्यद, पोलिओ पर्यवेक्षक चंदन पाटील, अशोक चौधरी, राजेश कोळी, विवेक इंगळे, दिनेश महाजन, आरोग्य सेविका आरती पाटील, अलका वैदकर, नगरपरिषद कर्मचारी सविता काटे, सागर सपकाळे, अंगणवाडी सेविका मालती कोल्हे, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
.पालकांना आवाहन
आरोग्य विभागाने सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन केले आहे. पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येक पालकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.














